अभिनेत्री एंजल रायला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

0

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल राय हिला एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईत गोरेगाव येथील बांगुर नगरमध्ये राहणाऱ्या एंजलला गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांना वैतागून एंजलने पोलिसात याप्रकरणी एफ आय आर नोंदवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल रायला अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेज असणारे ई-मेल्स येत आहेत. इतकंच नव्हे तर तो व्यक्ती तिला जिवंतपणी जाळण्याचा आणि शरीराचे तुकडे करण्याची धमकी देत आहे. अभिनेत्रीला यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. अभिनेत्रीची आगामी वेबसीरिज ‘घोटाला’चा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून येणाऱ्या धमक्यांचं प्रमाण वाढलं, असा दावा तिने केलाय. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने अभिनेत्रीने घाबरुन पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येणार आहे. अभिनेत्री एंजल रायचे सोशल मीडियावर २५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची आगामी वेबसीरिज घोटाला २९ मार्चला रिलीज होणार आहे. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी अभिनेत्रीला आशा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech