मुंबई, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी श्री.अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान श्री. जाधव यांनी अधिकारी-कर्मचारी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनोरंजन क्षेत्रात होणारे बदल समजून घेत महामंडळाने वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. नुकतेच केंद्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा दिला आहे. आपले महामंडळदेखील भाषा,कला, साहित्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत असल्याने दर्जेदार कार्यक्रम राबविण्यावर आगामी काळात प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
पुढे विस्ताराने सांगतांना श्री. जाधव म्हणाले की, चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करून आगामी काळात आशिया खंडातील सर्वोत्तम चित्रनगरी म्हणून दादासाहेब फाळके चित्रनगरी उदयास येईल यासाठी प्रयत्न करून आर्थिकवृद्धी होईल यासाठी चित्रीकरण वाढविण्यावर भर द्यायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, श्री. जाधव यांनी चित्रनगरी परिसराची भ्रमंती करुन परिसराची माहिती जाणून घेतली.