झी एन्टरटेन्मेंट करणार रतन टाटांवर चरित्रपट

0

मुंबई, 11 ऑक्टोबर :जगप्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक चित्रपट येणार आहे. झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका यांनी याबाबत घोषणा केली आहे. झीने हा प्रस्ताव टाटा कुटुंबायांसमोर मांडला असून ते त्यांच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. टाटा कुटुंबाच्या परवानगीनंतरच या चित्रपटाचे शुटींग सुरु होईल.

रतन टाटा यांचे कार्य भारतीयांच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. टाटा यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्य पुढच्या पिढ्यांना समजावे, यासाठी हा चित्रपट करण्याचा प्रस्ताव आम्ही समोर ठेवला असल्याचे झी इंटरटेनमेंटचे सीईओ पुनित गोयंका यांनी सांगितले.

रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जगावर सकारात्मक प्रभाव टाकेल. त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकवेल आणि लाखो लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रेरित करेल, असे झीचे अध्यक्ष आर. गोपालन म्हणाले.

रतन टाटा यांच्या जीवनावरील डॉक्युमेंटरी / चरित्रात्मक चित्रपटावर काम करताना आम्हाला सन्मान आणि अभिमान वाटतो. त्यांच्या जीवनाचे चित्रिकरण योग्य ताकदीने करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे झी स्टुडिओचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश बन्सल यांनी म्हटले आहे.

जगातील 190 पेक्षा जास्त देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झी स्टुडीओच्या माध्यमातून केला जाणार आहे. या चित्रपटातून मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी दान केला जाईल, अशी माहिती झी मीडियाचे सीईओ करण अभिषेक सिंग यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech