बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

0

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा सध्या त्याच्या ‘जाट’ या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतोय.अशातच रणदीप हुडानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. अभिनेत्यासोबत त्याची आई आशा हुडा आणि बहीण डॉ. अंजली हुडा उपस्थित होत्या. रणदीपने या खास भेटीची एक झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रणदीपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केलेत. हे शेअर करत रणदीप म्हणाला, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची आणि विशेषाधिकाराची बाब आहे. आपल्या देशाच्या भविष्याबद्दलचे त्यांची अंतर्दृष्टी, ज्ञान आणि विचार नेहमीच प्रेरणादायी असतात. त्यांनी दिलेली पाठीवरची थाप आपल्या क्षेत्रात चांगलं काम करत राहण्यासाठी आणि आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबद्दल रणदीपनं सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही जागतिक व्यासपीठावर भारतीय चित्रपटांचा वाढता प्रभाव, प्रामाणिक कथाकथनाची शक्ती आणि सरकारच्या जागतिक स्तरावर भारतीयांचा आवाज उंचावण्यासाठी सज्ज असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025′ बद्दल चर्चा केली”. पोस्टमध्ये पुढे त्यानं लिहलं, “माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण होता, यावेळी माझी आई आशा आणि बहीण अंजली हुडा यांनी त्यांच्या स्थूलपणाविरोधी मोहिमेबद्दल आणि समग्र आरोग्यासाठीच्या त्यांच्या उपक्रमांबद्दल पंतप्रधान मोदींना सांगितलं”.

जाट’ चित्रपटात ॲक्शन, इमोशन, ड्रामा यांच्यासोबतच संवाद देखील खूप दमदार आहे. तसेच उर्वशी रौतेलाचे आयटम साँगही आहे. लेखन व दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. यात सनी देओल, रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांचा अभिनय पाहायला मिळतोय. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन ११ दिवस झाले आहेत. या ११ दिवसांत चित्रपटाने एकूण १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर, सनी देओलच्या चित्रपटाने ७४.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ‘जाट’चित्रपटाच्या आधी रणदीप हुडा हा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात दिसला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech