मुंबई – सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी मालिकेच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले. निर्माते आणि लेखक संतोष अयाचित आणि शनिदेवांच्या भूमिकेत असलेले संकेत खेडकर हे सहभागी झाले. यांनी शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतले आणि मालिकेनिमित्त छोटेसे हवन देखील केले. त्या नंतर कलाकारांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. या वेळी श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर यांचा मोठा हातभार लाभला. त्याशिवाय अध्यक्ष भागवत सोपान बानकर, उपाध्यक्ष विकास नानासाहेब बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोर्डे, चिटणीस आबासाहेब शेटे मा. आ. शंकरराव गडाख, नितीन शेटे हे देखील उपस्थित होते. यांचे मालिकेच्या टीमने विशेष आभार व्यक्त केले.
जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून ८ मे पासून सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका, ‘जय जय शनिदेव’, ८ मे पासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.