मुंबई – धर्मवीर आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि आता त्या सगळ्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले. आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले,”आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या एका भागातून दाखविणे शक्य नव्हते. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब जगभरात पोहोचले आणि ‘असा माणूस होणं नाही’ हे ही सर्वांना समजलं. त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, त्यामुळेच आम्ही ‘धर्मवीर 2’ करण्याचं ठरवलं.”
पुढे याविषयी बोलताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले,” ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता. कालांतरानं मी तो बदलला. काही केल्या मनात इच्छा असूनही ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या गोष्टी या जुळून येत नव्हत्या. शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली आणि ‘धर्मवीर 2’ चित्रपट करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला खरं वाटणार नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी या अचानकपणे लगेच जुळून आल्या आणि ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजेच आजही दिघे साहेब हे आपल्या आजूबाजूला असल्याची प्रचिती मला मिळाली.”
पुढे ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल प्रेम आणि ‘धर्मवीर 2’ ला असलेल्या अपेक्षित प्रेमाविषयी बोलताना साहील मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल म्हणाले, “ज्याप्रमाणे ‘धर्मवीर’ हा चित्रपटाला रसिकप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद हा ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाला मिळेल याची आम्हाला आशा आहे.” येत्या 9 ऑगस्ट रोजी ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीला येणार आहे.