नवी दिल्ली : मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात दिल्लीमध्ये मंगळवारी १८ मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, केंद्रीय गृह सचिव, संसदीय विभागाचे सचिव आणि ‘यूआयडीएआय’चे सीईओ उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, मंगळवारी १८ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगात ही बैठक होणार आहे. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी आणखी कोणतीही मुदत निश्चित करण्यात आली नसल्याचे समजते. निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असताना अलीकडे केंद्रीय निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना करत असल्याचे निदर्शनास आले आहे. निराकरण न झालेल्या निवडणूक समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांकडून ३० एप्रिलपर्यंत सूचना मागवल्या आहेत. निवडणूक आयोग सर्व राजकीय आणि प्रादेशिक पक्षांच्या अध्यक्षांसोबत आणि वरिष्ठ नेत्यांसोबत निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करण्यासंदर्भात सल्लामसलत देखील करणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, दोन वेगळ्या राज्यातील मतदारांचा सारखा मतदार ओळखपत्र क्रमांक असणे म्हणजे ते बनावट मतदार नाही. दरम्यान, मतदान ओळखपत्र क्रमांकाशी संबंधित आणि इतर निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्ष वारंवार प्रश्न उपस्थित करत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.