मुंबई : समाजात अद्यापही फारसा खुलेपणाने न बोलला जाणारा विषय म्हणजे लैंगिक सुसंगती. याच नाजूक विषयावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे यात पुष्कर जोग एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पुष्करचा असा लूक यापूर्वी कधीच त्याच्या चाहत्यांनी पाहिलेला नाही. त्याचा हा नवा लूक आणि व्यक्तिरेखेतील सच्चेपणा यामुळे प्रेक्षकांना त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल पुष्कर जोग म्हणतो, “आजवर मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केले, परंतु ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. माझ्या चित्रपटातील प्रत्येक पात्र मी सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलेले असते. मी नेहमीच पात्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग यातही केला आहे. या भूमिकेसाठी मला माझ्या लूकवर विशेष मेहनत घ्यावी लागली. केस कमी दाखवण्यासाठी दररोज सेटवर सगळ्यात आधी येऊन मेकअप आणि हेअर स्टायलिंग करावे लागत होते. या लूकला शूटिंग संपेपर्यंत सांभाळून ठेवणे देखील एक चांगलीच कसरत होती! मात्र, हे पात्र साकारताना खूप समाधान मिळालं, कारण हे पात्र आजच्या काळातील अनेक लोकांच्या आयुष्यातील वास्तव सांगणारे आहे. प्रेक्षकांशी भावनिक संवाद साधणे हे मला महत्वाचे वाटते. चित्रपटाच्या कथानकात दोन व्यक्तींमधील भावनिक सुसंवाद किती महत्वाचा आहे हे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.”
‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट २१ मार्चला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.