ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
अनंत नलावडे
मुंबई : ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि देशभक्तीपर चित्रपटांचे शिल्पकार मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “हिंदी चित्रपटसृष्टीतील दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व असलेल्या मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली. त्यांच्या ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या कालातीत चित्रपटांनी त्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर समाजातील वास्तव आणि राष्ट्रनिष्ठा प्रभावीपणे मांडली.त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.”असेही त्यांनी यावेळी दुखःद अंतःकरणाने नमूद केले.
भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार, ‘पद्मश्री’ यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवले गेलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या कार्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा अर्थ लाभला.”त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद्गती लाभो,अशी प्रार्थना मी करतो,” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.