मुंबई : कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या शोची सध्या चांगलीच चर्चा टेलिव्हिजन विश्वात सुरु आहे. सोनी मराठीवर कीर्तनकारांची ही भव्य परंपरा समृद्ध करण्यासाठी हा अद्भुत शोधपर्व सुरु होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या रिअॅलिटी शोच्या शीर्षकगीतानं शोची उत्सुकता आधीच वाढवली आहे. आता या शोमध्ये परीक्षक कोण असणार, याचा आता खुलासा झाला आहे.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या शोमध्ये सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठीने संप्रदायातील या दोन दिग्गज कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील आणि हभप राधाताई महाराज सानप ह्यांच्यावर सोपविली आहे. वर्तमानातल्या घडामोडींचा संदर्भ देऊन सद्य परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारे हे दोन परीक्षक कार्यक्रमात उदयोन्मुख कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
अत्यंत अभ्यासू कीर्तनकार ह.भ.प. राधाताई सानप या कर्तृत्वान आणि प्रतिभावान असून त्या सांप्रदायिक कीर्तनं, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी अशा शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाजजागृतीचं काम करतात. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती अन् मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यांमुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना भाविक आवर्जून उपस्थित राहतात.