प्रलोभने लाथाडणारा अवलिया पत्रकार : पंढरीनाथ सावंत !

0

-योगेश वसंत त्रिवेदी

आजकाल आमच्या प्रतिनिधी कडून, विशेष प्रतिनिधी कडून, आमच्या बातमीदाराकडून, आमच्या वार्ताहरा कडून ऐवजी आत्ताच हाती आलेल्या पाकिटावरुन असे छापायची वेळ आली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हो आता जी पे चा जमाना आहे म्हटल्यावर पाकिटाचाही प्रश्न मिटला. पण या संपूर्ण वातावरणात प्रलोभने लाथाडणारा एक अवलिया पत्रकार. शनिवारीच त्याने इहलोकीची यात्रा संपविली. या अवलियाचे नांव आहे पंढरीनाथ धोंडू सावंत. शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे पहाटे झोपेतच पंढरीनाथ सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे श्रीनिवास पंढरीनाथ सावंत यांनी म्हणजेच पंढरीनाथ सावंत यांच्या सुपूत्राने भ्रमणध्वनी वर सांगितले.

अर्थात ही बातमी अपेक्षितच होती. कारण गेल्या दोन महिन्यांपासून ते बिछान्यावरच होते. सूनबाई सौ श्वेता श्रीनिवास सावंत यांनी तशी कल्पना दिली होती. गेल्या वर्षी ७ जानेवारी २०२४ रोजी मी आणि विलास मुकादम हे आवर्जून पंढरीनाथ सावंत यांना भेटायला त्यांच्या दिग्विजय मिल, पत्रा चाळ नंबर दोन, खोली नंबर बारा, काळाचौकी या निवासस्थानी गेलो. नव्वदावे वर्ष पूर्ण करुन ९१ व्या वर्षात त्यांनी प्रवेश केला होता. त्याही परिस्थितीत त्यांनी ‘मुंबईची निर्मिती कशी झाली?’ हे पुस्तक लिहायला घेतले होते. सुमारे पाचशे पाने लिहून झाली असल्याचे सरुताईंनी (सूनबाई) सांगितले. त्या दिवशी अरविंद सावंत, अनिल कोकिळ आदींनी पंढरीनाथ सावंत यांचे अभीष्टचिंतन केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने त्यांना कृ. पां सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. मला ते म्हणाले की पुरस्कार माझ्या हयातीत मिळेल नां ? माझ्याकडे उत्तर नव्हते. २१ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालयात परिषद सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. अर्थात ते गेल्या दोन महिन्यांपासून बिछान्यावरच असल्याने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सूनबाई सौ श्वेता श्रीनिवास सावंत आल्या होत्या. वेळच्या वेळी गोष्टी झाल्या तर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही, हे महत्त्वाचे. अर्थात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे आणि त्यांच्या कार्यकारिणीने प्रयत्न केले परंतु सत्ताधाऱ्यांची वेळ मिळण्यास विलंब झाला. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालयचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते धनी ठरले आहेत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन्मानपत्रावर नजर टाकली तर त्यांच्या जीवनाचा गोषवारा कळतो. दिग्विजय मिल पत्राचाळ या जागेत पंढरीनाथ सावंत यांचे वास्तव्य १९५६ सालापासून आहे. दोन खोल्यांमध्ये पत्नी, चार अपत्ये अशा संसाराचा गाडा त्यानी आजवर ओढला. बेस्ट बसचे ४५८५ नंबरचा बिल्ला परिधान केलेले कंडक्टर म्हणून मुंबई मध्ये त्यांनी काम सुरु केले.

उत्तम चित्रकार, सर्वोत्तम पत्रकार, परखडपणे विचार मांडणारे अशी त्यांची ख्याती. शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी पंढरीनाथ सावंत यांना दोन तीन वेळा गळ घातली की मुख्यमंत्री स्वेच्छाधिकारातून घर घ्या, अगदी घराची किल्ली सुद्धा आणून देण्याचा प्रयत्न झाला परंतु स्वाभिमानी बाण्याच्या पंढरीनाथ सावंत यांनी ते धुडकावून लावले. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा मराठा बंद पडल्यानंतर मराठा समाजासाठी मराठा नावाचे दैनिक सुरु करुन संपादक व्हा, अशीही गळ घालण्यात आली परंतु अत्रेंचा मराठा चालला ती परिस्थिती वेगळी होती आता तो चालणार नाही, असे स्पष्ट सांगून तेही फेटाळून लावले. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आपल्या जीवनाचे सार्थक झाले, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी कैकवेळा आमच्याकडे बोलून दाखवली. विजय वैद्य हे पंढरीनाथ सावंत यांच्या बरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या सांज मार्मिक या दैनिकात एकत्र होते. रात्री अंकाचे काम संपले की ते दोघेही कागदाच्या गठ्ठ्यांवरच झोपायचे. एकदा पहाटे पहाटे फोरमन आला, सावंत साहेब, छोटा फिलर हवाय, असे म्हणाला. सावंतांनी ए विज्या, बघ जरा छोटीशी बातमी दे लिहून. डोळे चोळत विजय वैद्य उठले आणि पटकन बातमी लिहून दिली की “उल्हासनगरमध्ये महाविद्यालय होणार !”. ना शेंडा ना बुडखा कुणास ठाऊक. सकाळी उठून सांज मार्मिक पाहिला आणि वैद्य म्हणाले ही बातमी कुणी दिली ? सावंत म्हणाले अरे विज्या तूच दिलीस नां. अरे हो लक्षातच आले नाही असे मग वैद्य यांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांत उल्हासनगरमध्ये महाविद्यालय झाले सुद्धा. ९ डिसेंबर २०२१ रोजी विजय वैद्य यांच्या आठवणीतले प्रबोधनकार या पुतकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात दस्तुरखुद्द पंढरीनाथ सावंत यांनी हा किस्सा सांगून वैद्य हे भविष्यवेत्ते असल्याचे सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांना मार्मिक मध्ये कार्यकारी संपादक म्हणून अखेरपर्यंत काम करण्याचा शब्द पंढरीनाथ सावंत यांनी दिला होता पण शारीरिक परिस्थिती साथ देत नसल्याने त्यांनी ते काम सोडले. ज्येष्ठ पत्रकार श्री. मुकेश माचकर हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ही जबाबदारी यथायोग्य पार पाडीत आहेत. टीव्हीएस ५० या आपल्या आवडत्या दुचाकीवरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. पुढारी मध्ये काम करतांना एकदा ते गरमागरम भजी खात होते आणि संपादकांनी बोलावल्याचा निरोप आला. त्यांनी शिपायाला येतो म्हणून सांगितले पण आधी भजी गरम आहेत तोवर ती खाऊन घेतो, संपादक थांबतील थोडा वेळ. असे असंख्य किस्से पंढरीनाथ सावंत यांचे आहेत. त्यांची ग्रंथसंपदा पण मोठी आहे. एका ए /४ आकाराच्या कागदावर त्यांनी लिहिलेल्या मजकुरात वर्तमानपत्रांचे स्तंभ भरण्याची क्षमता होती. आपल्याला गप्पांमध्ये गुंतवून ते कधी आपले लिखाण पूर्ण करुन येतील याची कुणालाही कल्पना नसे. कुमार कदम, वसंत सोपारकर यांची त्यांची घनिष्ठ दोस्ती. सोपारकरांना त्यांनी आपल्याबरोबर मार्मिकच्या कामातही सहभागी करुन घेतले होते. भाऊ तोरसेकर, विजय साखळकर यांनाही त्यांचा सहवास लाभला.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस श्री. प्रवीण पुरो आणि कार्यकारिणी तर्फे श्री. पंढरीनाथ सावंत यांना २१ जानेवारी २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात देण्यात आलेले सन्मानपत्र (जे त्यांच्या सूनबाई सौ. श्वेता श्रीनिवास सावंत यांनी स्वीकारले) : बेस्ट बस कंडक्टर ते कार्यकारी संपादक, सर्वोत्तम विश्लेषक ! माननीय श्री. पंढरीनाथ धोंडू सावंत, आपणांस हे सन्मानपत्र देण्यास आम्हाला अतीव आनंद होत आहे किंबहुना आपल्या चरणी शब्दपुष्प अर्पण करतांना आम्ही स्वतः धन्य झालो आहोत, अशीच अनुभूती येत आहे. मुंबई, महाड, विन्हेरे आणि पुनश्च मुंबई असा आपला जीवन प्रवास अत्यंत खडतरपणे झाला आहे. बेस्ट बस कंडक्टर म्हणून मुंबईकरांच्या जीवनवाहिनीशी एकरुप होता होता अनेक वर्तमानपत्रांतून आपला अमीट ठसा आपण उमटविलात आणि गिरणगावचा पंढरी थेट थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या सान्निध्यात जाऊन पोहोचला. ती. स्व. दादा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचे अमूल्य मार्गदर्शन ग्रहण केलेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण शिवसेना भवनात मार्मिक ची कार्यकारी संपादक म्हणून धुरा समर्थपणे सांभाळलीत. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिलेला आशीर्वाद आपला यथोचित गौरव करणारा आहे.

आपल्या आयुष्यात अनेक प्रलोभने आलीत परंतु ती कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, कुणाचीही भीडभाड न ठेवता आपल्या परखड स्वभावामुळे आपल्याजवळ टिकू शकली नाहीत. आपण अनेक पत्रकार घडविलेत. आपल्या मुशीतून तयार झालेले अनेक लेखक मराठी साहित्य शारदेच्या प्रांगणात स्वैर संचार करु लागले आहेत. आपल्या सहधर्मचारिणीने इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान केले. हे दुःख उराशी बाळगून आपण खंबीरपणे वाटचाल करीत आहात. असंख्य पुस्तके लिहून आपण मराठी साहित्य शारदेची सेवा बजावलीत. आजही वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईच्या निर्मितीचे पुस्तक आपल्या लेखणीतून साकार होत आहे. आपल्या जीवनाची वैशिष्ट्ये एका सन्मानपत्रात सामावू शकत नाहीत. अनेक ग्रंथ अपुरे पडतील. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने आपणांस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज आम्ही मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन आम्ही स्वतःलाच गौरवान्वित करीत आहोत.

पंढरीनाथ सावंत यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी त्यांच्याकडून कात्रणे मागविण्यात यावीत, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ? मी जीवंत आहे तोपर्यंत तरी मला याचा लाभ मिळेल कां ? असा सवाल जेंव्हा ते बिछान्यावर पडण्यापूर्वी विचारायचे तेंव्हा त्यांना आपण कोणत्या तोंडाने हो म्हणणार होतो ? शासन हे खरोखरीच ‘शासन'(शिक्षा) करणारे आहे कां ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असो, माझ्या ‘पासष्टायन’ या माझ्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या पुस्तकाला विजय वैद्य यांच्यामुळे पंढरीनाथ सावंत यांनी प्रस्तावना दिली आणि असेच लिहित रहा, असा आशीर्वाद दिला, हे माझे खरोखरच अहो भाग्य ! ‘मी पंढरी… गिरणगावचा!’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या आणि प्रलोभने लाथाडणाऱ्या या अवलिया पत्रकाराला मानाचा मुजरा !

-योगेश वसंत त्रिवेदी,
९८९२९३५३२१
( लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech