‘विस्मृती’चा रोग जडलाय भाजपला !

0

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रखर आंदोलनानंतर आणि आणीबाणी उठल्यानंतर १९७७ साली समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना कॉंग्रेस या चार पक्षांची जनता पार्टी स्थापन झाली. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा ही पार्टी सत्तेवर आली आणि मग तिची स्थापना झाली. परंतु मधू लिमये, राजनारायण आदींच्या सततच्या दुहेरी निष्ठेच्या टीकेमुळे ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, विजयाराजे सिंधिया/शिंदे, मुरली मनोहर जोशी यांनी मुंबई येथे महाअधिवेशन भरवून जनता पार्टीच्या आधी भारतीय हा शब्द जोडून भारतीय जनता पार्टी स्थापन केली. ९५ टक्के लोकांचा विरोध असतांना केवळ अटलबिहारी वाजपेयी यांच्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टी ने ‘गांधीवादी समाजवाद’ स्वीकारला. आज अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही त्यामुळे त्यांचे विचार आताच्या भारतीय जनता पक्ष नेत्यांच्या विस्मृती मध्ये गेले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

२०१४ नंतर आलेल्या नवनेतृत्वालाच हा विस्मृतीचा रोग जडला आहे असेच म्हणावे लागेल. कारण अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील बाबी सुद्धा आताच्या नेतृत्वाच्या विस्मृतीत गेलेल्या दिसतात. २००२ साली नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा प्रकरणी वाजपेयी यांच्या भूमिकेमुळे जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे उपकार केले होते ते उपकार नरेंद्र मोदी यांच्या विस्मृतीत गेलेले २०१९ नंतर दिसून आले. २००२ साली जेंव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदलण्याची भूमिका घेतली होती परंतु तो निर्णय घेण्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना वाजपेयी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पाठविले होते तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते की मोदी को हात मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भाजप गया. हा सल्ला मनाचा मोठेपणा दाखवून अटलबिहारी वाजपेयी यांनी मान्य केला.

आजही गुजरातच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे हे वक्तव्य ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ऐकविण्यात येते परंतु हे उपकार भारतीय जनता पार्टीच्या विस्मृतीत गेले आहेत की काय असे म्हणावे लागते. अटलबिहारी वाजपेयी हे भर संसदेत म्हणाले होते कीं, सरकारे आऍंगी, सरकारे जाऍंगी, पार्टियॉ बनेगी, पार्टियॉ बिगडेगी लेकिन देश रहेना चाहिए. आता नेमके उलट झाले असून अटलबिहारी वाजपेयी यांचा हा महत्त्वाचा विचार विस्मृतीत गेलेला दिसून येतो. आता पार्टियॉ तोडेंगे, सरकारे बनाऍंगे भले देश के/राज्यों के सिद्धांतो का कुछ भी हो | शिवसेनेने खांद्यावर घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने गगनाला गवसणी तर घातली परंतु पायाने शिवसेनेला दाबून टाकण्याचे महत्पाप आताच्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने केले आहे. पण १९ जून १९६६ रोजी शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातलेली शंभर नंबरी सोने असलेली आणि भारतीय जनता पार्टी पेक्षा वयाने मोठी असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फिनिक्स पक्ष्यासारखी गरुडझेप घेतल्या शिवाय राहणार नाही.

२०१४ आणि २०१९ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आपली सत्ता पाच वर्षे टिकावी म्हणून २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांना मातोश्रीच्या दारात पाठवून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा मिळविला. ५ डिसेंबर २०१४ रोजी शिवसेना भारतीय जनता पार्टी च्या सरकारात सहभागी झाली. पाच वर्षे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार टिकले, परंतु सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र झाली की उद्धव ठाकरे यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या नेत्यांच्या विस्मृतीत गेले की आपण कुणाच्या पाठिंब्यावर मंत्रालयातल्या सत्तेतील खुर्च्यांवर पाच वर्षे राहिलो. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चेसाठी हॉटेल सोफिटेल, मातोश्री येथे आले, बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा केली आणि ज्या चर्चेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी नव्हते त्या देवेंद्र फडणवीस यांनी वरळीच्या हॉटेल ब्ल्यु सी मध्ये भरगच्च पत्रकार परिषदेत अमित शाह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर केले. या जाहीर करण्यात आलेल्या घोषणांमध्ये सत्तेची जबाबदारी पन्नास पन्नास टक्के हेही महत्त्वाचे सूत्र जाहीर करण्यात आले होते, परंतु तेही विस्मृतीत गेले. आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दोन्ही कॉंग्रेस बरोबर महाविकास आघाडी मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागला.


नुकत्याच झालेल्या षण्मुखानंद सभागृहातील महाविकास आघाडी च्या जबरदस्त मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी ला विस्मृती मधून बाहेर येऊन स्मृती जागेवर ठेवण्यासाठी जाणीव करुन दिली. लोकसभेच्या निवडणुकांच्या सुमारास अबकी बार चारसोपार अशी घोषणा बेंबीच्या देठापासून देण्यात आली त्याच वेळी कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार बोलून गेले की चारसोपार जागा येताच देशाचे संविधान बदलण्यात येईल. याच प्रकारची वक्तव्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी केली पण ते विस्मृतीत गेले आणि जशा ५४३ पैकी केवळ २४० जागांवर समाधान मानावे लागण्याची नामुष्की ओढवली इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या ४५ प्लस जागा जिंकण्याचे मनसुबे धुळीला मिळाले, तेंव्हा फेक नरेटिव्हचा उद्घोष वरपासून खालपर्यंत सर्वच नेत्यांनी सुरु केला आहे. मग मित्रपक्ष सुद्धा अहमहमिकेने सुरात सूर मिळवू लागले. शिवसेना फोडण्याचे महत्पाप भारतीय जनता पक्षाने केले. याची कबुली सुद्धा पक्ष नेतृत्वाने दिली. त्याचवेळी अजित पवार यांनी ते अखंड राष्ट्रवादी पक्षाचे नेते असतांना भर विधानसभेच्या सभागृहात बोलतांना शिवसेना सोडलेले पुन्हा निवडून येऊ शकत नाही हे छगन भुजबळ यांचा नामोल्लेख करुन ठणकावून सांगितले होते.

अर्थात काकांना सोडून जातांना हे भाषणही दादांच्या विस्मृतीत गेले असावे, परंतु ते विधिमंडळाच्या ग्रंथालयातील इतिवृत्तात कायम मिळेल. ते विधिमंडळाच्या विस्मृतीत जाऊ शकणार नाही. लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीचा उल्लेख केला. परंतु भारतीय जनता पक्षात आणि सोबत घेतलेल्या मित्रपक्षांत या दोन्ही गोष्टी भरभरून दिसत असतांना, मित्र म्हणून नव्याने जोडलेल्या किंबहुना आपल्या वॉशिंग मशिन मधून स्वच्छ करण्यात आलेल्यांवर जे जे आरोप करण्यात आले होते ते सर्व विस्मृतीत गेले आहेत की काय अशी शंका येते. भारतीय जनता पार्टी मध्ये असलेल्या घराणेशाहीची यादी प्रसिद्ध करावयाची म्हटले तर त्याचा स्वतंत्र ग्रंथ होऊ शकतो. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे जे मंत्री भ्रष्टाराचाराचे आरोप झाले म्हणून मंत्रिमंडळातून बाहेर गेले ते पुन्हा मंत्रिमंडळात आले. परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते पुनश्च मंत्रिमंडळात आले नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या ‘झुंजार’ नेत्यांनी ज्यांच्या ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते राज्याच्या मंत्रिमंडळात सुखेनैव सत्ता उपभोगतांना दिसत आहेत. हे आदर्श भारतीय जनता पार्टी मध्ये विस्मृतीत गेले असले तरी लोकांच्या स्मृतींमध्ये या गोष्टी कायम आहेत. संविधान संविधान म्हणून सध्या चर्चा जोरात आहे परंतु षण्मुखानंद सभागृहात आदित्य ठाकरे यांनी संविधान बदलण्याची सुरुवात महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झाली असल्याचे आवर्जून सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या प्रचारसभांमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेनेची भारतीय जनता पार्टीच्या वरपासून खालपर्यंत सर्वच नेत्यांनी जी अवहेलना करण्याचा, बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे तो अक्षम्य आहे, तो निष्ठावंत शिवसैनिकांच्या विस्मृतीत कदापि जाऊ शकत नाही, म्हणून एहसानफरामोश, कृतघ्न लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक आणि महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. षण्मुखानंद सभागृहात झालेला जबरदस्त यशस्वी मेळावा हा तर ट्रेलर होता पूर्ण फिल्म लवकरच पहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्ते यांच्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे आणि हातात घेतलेल्या मशालीने विजयाची तुतारी वाजविण्याच्या तयारीत महाराष्ट्रातला सुजाण नागरिक तैयार आहे. मतरुपी आशीर्वाद दिले नाहीत तर लाडक्या बहिणीच्या भाऊबीजेची रक्कम परत घेऊ अशी ‘राणा’ भीमदेवी थाटात केलेली वक्तव्ये त्यांच्या विस्मृतीत गेली असतील तरी ती जाणीवपूर्वक आठवणीत ठेवून मतदान यंत्रांची बटणे ‘कचाकचा’ दाबण्यात येतील आणि कृतघ्न महायुतीला पदच्युत करुन तिरंग्याच्या रक्षणासाठी अस्सल शिवसेनेचा अस्सल भगवा फडकवून सत्ताबदल केल्याशिवाय निष्ठावंत मतदार स्वस्थ बसणार नाही.

– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech