विशाखापट्टणम, 31 मार्च : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय तिरंगी सेवा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) तसेच जमीन आणि समुद्रावरील उभयचर सराव – टायगर ट्रायम्फ 2024 चा समारोप समारंभ शनिवारी अमेरिकन नौदलाच्या रोजी यूएसएस सॉमरसेट जहाजावर आयोजित करण्यात आला होता.
हा सराव दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी दर्शवतो. बहुराष्ट्रीय मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) मोहीमा हाती घेण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि मानक कार्यप्रणाली सामायिक करण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
या सरावाचा बंदरावर होणारा टप्पा विशाखापट्टणम येथे 18 ते 25 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात प्री-सेल चर्चा, विषय तज्ञांच्या विचारांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा, जहाजावरील कवायती आणि क्रॉस डेक भेटींचा समावेश होता.
भारताच्या चैतन्यपूर्ण आणि महान संस्कृतीचे प्रदर्शन घगवणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दोन्ही देशांच्या नौदलातील कर्मचाऱ्यांनी 25 मार्च 2024 रोजी होळीचा सण एकत्रित साजरा केला.
सरावाचा सागरी टप्पा 26 ते 30 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
या टप्प्यात दोन्ही देशांच्या तुकड्यांनी सागरी सराव केला आणि त्यानंतर संयुक्त कमांड आणि कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यासाठी तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहीमेअंतर्गत संयुक्त मदत आणि वैद्यकीय शिबिर उभारण्याचा सराव करण्यासाठी काकीनाडा इथे सैन्य उतरवले होते.
भारतीय नौदल आणि यूएस नौदलाच्या जहाजांदरम्यान क्रॉस डेक हेलिकॉप्टर सरावात काकीनाडा आणि विशाखापट्टणम येथे UH3H, CH53 आणि MH60R हेलिकॉप्टरनी सहभाग नोंदवला.
भारतीय नौदलाच्या सहभागी युनिट्समध्ये लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक, लँडिंग शिप टँक (मोठे) यांचा समावेश होता. यामध्ये नौदलाच्या इंटेग्रल लँडिंग क्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर, मार्गदर्शित मिसाइल फ्रिगेट आणि लांब पल्ल्याच्या सागरी शोध विमानांचाही समावेश होता.
भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व एका इन्फंट्री बटालियन गटाने केले होते, यात यांत्रिकी सैन्याचा समावेश होता तर भारतीय वायुसेनेने एक मिडीयम लिफ्ट विमान, वाहतूक करणारे हेलिकॉप्टर आणि जलद कृती वैद्यकीय पथक (RAMT) तैनात केले होते.
यूएस टास्क फोर्समध्ये यूएस नेव्ही लँडिंग प्लॅटफॉर्म डॉकचा समावेश होता . याशिवाय नौदलाचे अविभाज्य लँडिंग क्राफ्ट एअर कुशन आणि हेलिकॉप्टर, एक विनाशक, सागरी टेहळणी करणारै मिडीयम लिफ्ट विमान तसेच अमेरिकन पाणबुड्या यांचा समावेश होता.
तिन्ही सेवांमधील विशेष मोहीम कृती दलांनीही या सरावात भाग घेतला तसेच बंदर आणि सागरी टप्प्यात विशाखापट्टणम आणि काकीनाडा येथे यूएस समकक्षांसोबत संयुक्त सराव केला.