प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ मित्रपरिवाराचा पप्पू पाटकर :
हां हां म्हणता पप्पू पंचाहत्तर वर्षांचा झाला यावर कुणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही. मी १९७५ ते १९७८ या कालावधीत चर्नी रोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे मोनो कां स्टिंग मशीन ऑपरेटर या मुद्रण कलेतील एका तंत्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत होतो. या काळात प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ पप्पू पाटकर यांचा परिचय झाला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे याच कालावधीत एकदा ५४ दिवसांचा आणि एकदा ३७ दिवसांचा संप झाला होता. राज्य पातळीवर रमाकांत गणेश उर्फ र. ग. कर्णिक यांचे ज्वालाग्राही नेतृत्व प्रखर तेजाने तळपत होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या पासून आपल्या हयातीतील सर्वच मुख्यमंत्र्यांना र. ग. कर्णिक यांनी आपल्या कणखर नेतृत्वाची प्रचिती आणून दिली होती. याच दरम्यान शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे भाई आचरेकर, रवि भागवत, दादा मंडलिक, रामदास कदम, विजय सुर्वे ही कामगार नेते मंडळी झपाटून काम करीत कामगार चळवळ तेजाने पुढे नेण्याचे कार्य करीत असतांना प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ पप्पू पाटकर हेही कामगार नेते म्हणून उदयोन्मुख नेतृत्व तयार झाले होते. सुमारे शंभरहून अधिक शिकाऊ उमेदवारांची संघटना मी बांधली होती. प्रदीप मसुरेकर, आनंद चव्हाण, विजय चोरघे, सत्यवान तावडे, जनार्दन काटकर, सूर्यकांत कांबळी, विवेक कुलकर्णी, तांबडे असे असंख्य सहकारी सोबत घेऊन आम्ही सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडत असू आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने भांडत असू. बाळासाहेब ठाकरे यांचे वडिल केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे ज्या जळगाव येथील बातमीदार दैनिकात ‘घाव घाली निशाणी’ हा घणाघाती स्तंभ लिहित त्या ‘बातमीदार’चे संस्थापक संपादक विठ्ठल चावदस नेहेते यांचे चिरंजीव नरेंद्र हेही याच सुमारास शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे कार्यरत होते.
पप्पू पाटकर हे उल्हासनगरमध्ये आणि मी अंबरनाथ येथे वास्तव्यास होतो. पप्पू पाटकर हे चळवळीतील असल्यामुळे आमची चांगली गट्टी जमली. १३ मे १९६९ पासून २००७ पर्यंत कार्यरत असलेल्या पाटकर यांनी येथील कामगार संघटनेत १० वर्षे उपाध्यक्ष, सहकारी पतपेढी चे ९ वर्षे संचालक म्हणून कार्य केले. पद असो की नसो सदस्य म्हणूनही त्यांनी अनेकांना मार्गदर्शन करण्याचे, विधायक कामांना वाहून घेण्याचे व्रत अंगिकारले. मुद्रणालय कामगारांनी नाशिक येथे इमारत बांधण्यासाठी निधी संकलनाचे काम हाती घेतले तेंव्हा प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर यांनी तीन महिने रजा घेऊन त्या काळात तब्बल वीस लाख रुपये जमा केले. रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबिरे भरवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा करण्यात प्रफुल्ल पाटकर हे आघाडीवर राहिले. नंतरच्या काळात शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे अविनाश दौंड हेही कामगारांचे उदयोन्मुख नेतृत्व तयार झाले. र. ग. कर्णिक, सुनील जोशी, दादा मंडलिक, विश्वास काटकर, मिलिंद सरदेशमुख, अविनाश दौंड, विजय सुर्वे अशा कामगार नेत्यांची दणकेबाज फळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उभी केली त्यात प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ पप्पू पाटकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. पप्पू पाटकर यांना अनेक मान्यवरांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
पृथ्वी गोल आहे आणि मी आहुति, नवशक्ति, मुंबई सकाळ, सामना अशी पत्रकारिता करीत अंबरनाथ येथून बोरीवली येथे स्थायिक झालो. या भागात शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि आमचे स्नेही विजय वैद्य यांच्या सहकार्याने जोडले गेले त्यात हेमंत पाटकर हे प्रामुख्याने आमचे निकटवर्तीय झाले. प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर हे हेमंत पाटकर यांच्या नात्यात असल्याचे समजले. प्रफुल्ल पाटकर हे कांदिवली चारकोप येथे वास्तव्यास आले. त्यामुळे अंबरनाथ उल्हासनगर येथील मैत्रीच्या नात्याची वीण बोरीवली कांदिवली येथेही अधिक घट्ट झाली. प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर हे आपल्या वयाची ७४ वर्षे पूर्ण करुन अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. पप्पू पाटकर यांनी आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण करावे यासाठी त्यांना ठणठणीत आरोग्य प्राप्त व्हावे ही त्यांच्या कुलदेवतेकडे प्रार्थना !
-योगेश वसंत त्रिवेदी,
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)
(yogeshtrivedi55@gmail.com/9892935321)