ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात १० वी आणि १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी “गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम रविवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला.
उपस्थित विद्यार्थ्यांना प्रख्यात माईंड रीडर श्री. भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रताप सरनाईक यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपल्यातले बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा असा कानमंत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन मिळावे. त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्षे गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते असे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
लकी ड्रॉच्या माध्यमातून शिक्षणोपयोगी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम संपल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व आत्मविश्वास पाहण्यास मिळाला. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास ओवळा माजिवडा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.