सत्तेची नशा ही इतर कोणत्याही नशेपेक्षा खूपच वाईट असते. एकदा सत्तेची सवय झाली की ती मरेपर्यंत प्रत्येकाला हवी असते. आपल्यानंतर ही सत्ता आपल्या पुत्राला किंवा कन्येला मिळावी असा नवीन आटापिटा आता सुरू झाला आहे.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्यापूर्वी विसर्जित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मुख्यमंत्री पद पुन्हा आपल्याकडेच राहावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. दिल्ली वाऱ्या केल्या, दिल्लीतील भाजप नेत्यांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या. परंतु त्यांची डाळ कुठे शिजली नाही. शेवटी दरे या आपल्या गावी निघून जाऊन अमावस्येची पूजाही केली तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. 132 आमदार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष हा मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडेल असे वाटत नव्हते. कोणत्याही पक्षाचे राजकारण हे सर्वोच्च पदासाठी चालते. हे सर्वोच्च पद मिळवण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. मग भाजप ही काही सेवाभावी संस्था नाही तो सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेच्या लक्षातच आलेले नाही. सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाच्या एवढ्या जागा आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित होते तरीसुद्धा शिंदे सेनेचे प्रवक्ते वेगवेगळ्या माध्यमातून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार अशा आशयाच्या बातम्या पेरत होते. परंतु बातम्या पेरून कुणी मुख्यमंत्री होत नाही. तुमचे संख्याबळ हे भाजपच्या पुढे जाण्याएवढे नव्हतेच. भाजपला आपला पक्ष मोठा करायचा आहे शिंदे सेना नव्हे. शिवसेना संपवण्यासाठी शिंदेंचा उपयोग झाला आणि आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिले आणि खाली मान घालून एकनाथ शिंदे यांनी ते स्वीकारले म्हणजेच स्वीकारण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.
एकनाथ शिंदे हे कै.बाळासाहेबांचा वारसा सांगतात मीच बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे असा डंका पिटतात. परंतु ते खरेच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असते तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदी आपल्या एखाद्या आमदाराला नेमले असते. जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली त्याच्यापेक्षा मोठी चूक एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून केली आहे. ही तर सुरुवात आहे अजून अनेक धडे एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेला मिळणार आहेत. राजकारणात वेळोवेळी आपली उपयुक्तता आणि आपले उपद्रवमूल्य सिद्ध करावे लागते. अन्यथा तुम्ही प्रवाहातून बाहेर फेकले जायला वेळ लागत नाही.
आता तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गृह आणि नगर विकास हे दोन खातीही शिवसेनेला देण्यास नकार दिला आहे. शेवटी महसूल विभाग मिळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात मुंबईतील बिल्डर लॉबीला मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अजय आशर यांच्याकडून चांगलाच त्रास झालेला आहे. त्यामुळे या लॉबीने याबाबत तक्रारी पुराव्यासहित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोचवल्या आहेत. त्यामुळे नगर विकास मंत्री पद आता भाजपकडेच राहील अशी चिन्हे आहेत. 2014 ते 2019 या काळात मुंबई महानगर क्षेत्रातील बिल्डर लॉबी अतिशय सुखात होती. त्यांना कधीही त्रास झाला नाही. त्यामुळे त्या काळात निवासी बांधकामेही जोरात झाली. परंतु गेल्या पाच वर्षात या लॉबीला खूपच त्रास झाला. अनेक बिल्डर्स तर खाजगीत सांगतात की फडणवीस यांच्या काळात आम्हाला कधीही आमचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्रास झाला नाही.
अडीच वर्षांपूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन आपण फार मोठा त्याग केला हे दाखवून दिले मात्र आता या त्यागाची कशी वसुली होईल हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार पाहतीलच. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या मर्जीने ते मुख्यमंत्री झाले आता यापुढचा कारभारही एकनाथ शिंदे यांना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या मर्जीने चालवावा लागणार आहे.
आता शिंदे सेनेचे कोण मंत्री होणार? हे सुद्धा दिल्लीतून ठरणार आहे. दिल्लीत शिंदे सेनेला आपल्या मंत्र्यांची यादी पाठवावी लागणार आहे. दिल्लीतून या यादीला मंजुरी मिळाल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री शपथ घेणार आहे. त्यामुळे कै.बाळासाहेबांचा वारसा यापुढे तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सैनिकांना सांगू नये.
– नितीन सावंत, 9892514124