मराठी साहित्य आणि टाटा उद्योगसमूहासाठी मौल्यवान योगदान

0

समीक्षा : “रतन टाटा विशेषांक” –

मराठी साहित्यविश्वात आणि उद्योगक्षेत्रात एक प्रेरणादायी दालन उघडणारा ‘रतन टाटा विशेषांक’ हा एक महत्वपूर्ण प्रयत्न आहे. या विशेषांकात श्री. रतन टाटा यांच्या नेतृत्वगुणांचा, समाजभानाचा आणि उद्योगजगतातील दूरदृष्टीचा सखोल वेध घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व वाचनालय आणि ग्रंथालयांनी संग्रहित ठेवावा असा विशेषांक सत्यवान तेटांबे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केला आहे. तसेच या अंकातील संपादकीयात संपादक श्री सत्यवान तेटांबे यांनी अंकाचा विशेष आढावा घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विशेषांक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विशेषांक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे विशेषांक, धर्मवीर आनंद दिघे विशेषांक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे विशेषांक याबरोबरच दीपावली अंकासहित जवळपास १०० हून अधिक विशेषांक आतापर्यंत प्रसिद्ध केले आहेत. या रतन टाटा विशेषांकात सहसंपादक डॉ जिवबा केळुसकर, श्री उदय माळगावकर, डॉ सुनीलकुमार सरनाईक व श्री धनंजय आप्पासाहेब पाटील यांचे लेख वाचनीय आहेत. प्रसिद्ध लेखकॲड. प्रकाश लब्धे, श्री. सुभाष डिंगरे, सौ. भारती दिलीप सावंत, उमा दामोदर बंड, श्री. बाळ सिंगासने यांचेही अभ्यासपूर्ण लेख वाचनीय झाले आहेत.

एअर इंडियाच्या सेवानिवृत्त अधिकारी सौ. मीना नाईक इंगळे या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यरत असतांना त्यांना साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, नाट्य, उद्योग क्षेत्रातील विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्ती संपर्कात आल्या. त्यात रतन टाटा हे महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांना भेटले. रतन टाटा या निगर्वी महान उद्योगपतींनी मीनाताई नाईक यांच्या आदरातिथ्याने प्रभावित होऊन फार वर्षांपूर्वी शंभराची नोट सही करुन दिली. ही नोट मीनाताई नाईक यांनी जतन केली असून त्या नोटेच्या छायाचित्रासह आपले अविस्मरणीय अनुभव सांगितले आहेत. हेही सत्यवान तेटांबे यांच्या या रतन नवल टाटा विशेषांकाचे वैशिष्ट्य ठरावे.

हा विशेषांक केवळ माहितीपूर्ण लेखन न राहता, टाटा समूहाचा वारसा, योगदान आणि पुढील पिढीसाठी एक विचारधारा प्रतिबिंबित करतो. हा विशेषांक टाटा समूहाच्या शाश्वत मूल्यांची आठवण करून देतो. त्यांच्या व्यवसायातील नैतिकता, नव उपक्रमशील दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी यांची झलक प्रत्येक लेखातून दिसून येते.मराठी साहित्याच्या प्रवाहात उद्योग आणि नेतृत्व यांसारख्या विषयांना महत्त्व देणारा हा विशेषांक एक आदर्श ठरेल याची खात्री आहे. मराठी भाषेत अशा प्रकारचे साहित्यिक दस्तावेज उपलब्ध व्हावे यासाठी तरुणांना हा उपक्रम मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो. संपादकीय मंडळाच्या अथक परिश्रमांमुळे या अंकाला साहित्यिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.

या विशेषांकातील लेखकांनी टाटा समूहाच्या विविध पैलूंवर, व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.प्रत्येक लेख टाटा समूहाच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि उद्योग क्षेत्रातील स्थानाबद्दल वाचकांना विचार करायला भाग पाडतो. मराठी भाषेत व्यवसाय आणि नेतृत्वावरील असे परिपूर्ण वाचन जास्तीत जास्त उपलब्ध व्हावे, हा या सगळ्या गोळाबेरजेचे एक उद्दिष्ट होते, असेच म्हणावे लागेल.

हा प्रेरणादायी दस्तऐवज : ‘रतन टाटा’ विशेषांक हा केवळ टाटा समूहाच्या यशोगाथेपुरता मर्यादित नसून तो अभियांत्रिकी विद्यार्थी आणि उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. टाटा समूहाच्या ऑटोमोबाईल, स्टील, सॉफ्टवेअर आणि एयरोस्पेस क्षेत्रातील नवसंशोधनाची माहिती या विशेषांकात आहे. अभियंते आपल्या संशोधनाला व्यावसायिक रूप कसे देऊ शकतात, याचा अभ्यास यातून करता येईल. तसेच टाटा समूहाने समाजासाठी कसे काम केले आणि तंत्रज्ञान समाजोपयोगी कसे बनवले, हे समजून घेण्यासाठी हा अंक अत्यंत उपयुक्त आहे.

‘इनोव्हेशन विथ एथिक्स” दृष्टिकोन: टाटा समूहाचे प्रत्येक तंत्रज्ञान आणि उत्पादन ‘मूल्याधारित नवकल्पना’ (Value-Based Innovation) या तत्त्वावर आधारित आहे. हा दृष्टिकोन अभियंत्यांसाठी संशोधन करताना महत्त्वाचा ठरू शकतो. उद्योजकांनी केवळ नफा मिळवण्यावर भर न देता सामाजिक जबाबदारी आणि दीर्घकालीन विश्वासार्हता यावर भर द्यावा, असे टाटांचे तत्वज्ञान आहे. हा विशेषांक यशस्वी व्यवसाय कसा उभा करावा, त्याचे मूल्य कसे राखावे आणि संकटांवर मात कशी करावी यावर मार्गदर्शन करतो.

नेतृत्व आणि संकट व्यवस्थापन : टाटा समूहाने आर्थिक मंदी, टाटा नॅनोच्या संकटांवर कशी मात केली, 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलची पुनर्बांधणी कशी केली, यांसारख्या संघर्षकथा उद्योजकांना प्रेरणा देतील. भविष्यातील उद्योजकांनी संकट काळात निर्णय घेण्याची क्षमता कशी विकसित करावी, हे शिकण्यासाठी हा विशेषांक उपयुक्त आहे. AI, EV (इलेक्ट्रिक वाहन), स्टार्टअप्स आणि ग्रीन एनर्जी यासारख्या क्षेत्रात नवोद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेषांक टाटा समूहाच्या धोरणांवर प्रकाश टाकतो. ‘बिझनेस फॉर गुड’ हा दृष्टिकोन कसा अंगीकारावा, हे यातून शिकता येईल. रतन टाटा यांचे नेतृत्व आणि टाटा समूहाच्या यशस्वी व्यवस्थापनाचे लेख भारतातील उद्योजकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा भविष्यातील चेहरा घडवू शकतात.

हा विशेषांक म्हणजे उद्योजकतेला आणि तंत्रज्ञानाला नवी दिशा देणारा एक सखोल आणि मौल्यवान लेखसंग्रह आहे. हा विशेषांक प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये संग्रही असावा असाच आहे. हा अंक मिळविण्यासाठी साक्षीदार प्रकाशन श्री. सत्यवान तेटांबे (9869501368) आणि श्री. धनंजय पाटील (9960219573) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

– धनंजय पाटील, बोरीवली (पश्चिम) मुंबई

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech