“उदवाहन आख्याना”मुळे राजदंड हिरमुसतो तेव्हा…!

0

निलेश मदाने 

( या मजकुराचे लेखक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी असून विधान भवन येथील   वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण  केंद्राचे संचालक आहेत. ) 

भिन्न प्रकृतीचे आणि भिन्न प्रवृत्तीचे दोन नेते सभागृहात एकमेकांसमोर यावेत आणि वाद-प्रतिवाद-सुसंवाद या अपेक्षित परंपरेतुन जनतेच्या पदरात काहीतरी भलं पडावं ही गोष्ट संसदीय रितीरिवाजाला धरुन झाली. सभागृहात एखाद्या मुद्दयावरुन रणकंदन माजले, गरमागरमी झाली आणि ती दिवसभर चर्चेची घटना म्हणून नोंदविली गेली तरी एकवेळ समजण्यासारखे आहे. सर्वसहमती न होता एखाद्या मुद्दयावर दोन्ही बाजू ठाम रहाव्यात आणि त्यातून दिवसभर कामकाजाची कोंडी व्हावी (deadlock) तेही समजू शकते… पण अपघाताने अवघे काही सेकंद दोन भिन्न प्रकृती आणि भिन्न प्रवृत्तीचे नेते उदवाहन प्रतीक्षेच्या निमित्ताने समोरासमोर यावेत आणि तमाम माध्यमविश्व युरेकाsss युरेकाsss करत हर्षवायूबाधित व्हावे, याला काय म्हणावे !

सभागृहातल्या बाकांना अलिकडे पायऱ्यांचा हेवा वाटावा अशी परिस्थिती आहे. आता ही बाके गुरुवार, दिनांक २७ जून, २०२४ पासून उदवाहनांच्या नावाने देखील कडाकडा बोटे मोडीत आहेत. सभागृहातील “वैचारिक संघर्ष” आणि “व्यक्तिगत सौहार्दता” याचा एकेकाळी कोण बोलबाला होता. सभागृहातील संख्याबळापेक्षा संसदीय आयुधांची चमक आणि ती आयुधे वापरण्याचे वाकचातुर्य कोणे एकेकाळी याच बाकांनी “याची देही याची डोळा” अनुभवले आहे. आता पायऱ्यांवरचे सभागृह आणि उदवाहनभेटीची सौहार्दता हाच संसदीय कामकाजाचा केंद्रबिंदू आणि माध्यमांचा आकर्षणबिंदू ठरत असल्याने बाकांच्या खांद्यावर माथा टेकवून बिचारा राजदंड मात्र आसवं गाळत आहे ! दोन चक्षू आणि लेखणीच्या सहाय्याने सभागृह कामकाजाचे जे दर्शन “गॅलरीतून” या स्तंभाद्वारे चौथ्या स्तंभाचे साक्षेपी शिलेदार वाचकांना घडवित, त्यापुढे सध्याच्या थेट प्रक्षेपणासाठी बसवलेले डझनभर कॅमेरेसुध्दा गड्या फिके आहेत, अशी खंत हा हिरमुसलेला राजदंड कॅमेऱ्यांकडे जळजळीत कटाक्ष टाकत व्यक्त करीत आहे.

यशवंतराजी चव्हाण आणि आचार्य अत्रे, वसंतराव नाईक आणि यशवंतभाऊ मोहिते, शरदचंद्रजी पवार आणि केशवराव धोंडगे, मृणालताई गोरे, विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथजी मुंडे, छगन भुजबळजी आणि नारायणराव राणे, पृथ्वीराजजी चव्हाण आणि एकनाथरावजी खडसे, देवेंद्रजी फडणवीस यांच्यातील जुगलबंदी, हजरजबाबी, संसदीय सभ्यता हा समृध्द वारसा एकीकडे आणि सांप्रतकालीन उदवाहन आख्यान दुसरीकडे, याचा मेळ बसवावा तरी कसा याची चिंता देखील आता कोणालाही वाटेनाशी झाली आहे…

————————-

ता.क. संकेतबाह्य नव्या परंपरांची मालिकाच तयार करणाऱ्या या चौदाव्या विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाचा प्रारंभ देखील अशा सभागृहबाह्य उदवाहन आख्यान आणि त्याअनुषंगाने उदभवलेले राजदंड रूदन याने व्हावा याला काय म्हणावे ? या उदवाहन भेटीत अपघाताने अडकलेले आणि आपल्या विधानसभेतील उल्लेखनीय कारकिर्दीचा रौप्य महोत्सव साजरा करित असलेले उत्कृष्ट संसदपटू यांना या आख्यान आणि रूदनाचे मूक साक्षीदार व्हावे लागणे हे देखील तितकेच वेदनादायी … त्यांच्यासाठी आणि संसदीय लोकशाहीतील बलस्थानांविषयी आस्था असणाऱ्या सर्वांसाठीसुध्दा !

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech