इम्फाल – मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सायकुलचे माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या घराजवळ शनिवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाओकीपची दुसरी पत्नी सपम चारुबाला या स्फोटात जखमी झाल्या होत्या. त्यांना सायकुल येथील रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. स्फोटाच्या वेळी हाओकीप देखील घरात उपस्थित होते, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. माजी आमदार युमथोंग हाओकिप 2012 आणि 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा सैकुलमधून ते विजयी झाले आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दुसरीकडे, मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दहशतवादी आणि त्याच समुदायाच्या ग्रामीण स्वयंसेवकांमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेत 4 सशस्त्र जवानांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मोलनोम भागात झालेल्या चकमकीत युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे अतिरेकी आणि त्याच समुदायातील तीन गावातील स्वयंसेवक मारले गेले, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्युत्तर म्हणून, ग्रामीण स्वयंसेवकांनी यूकेएलएफचे स्वयंभू प्रमुख एस.एस. हाओकिप यांच्या घराला आग लावली. सध्या या घटनेनंतर तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.