मुंबई – भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (3) (घ) नुसार महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या अकरा सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना 16 जुलै रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आज (28 जुलै) मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे शपथ दिली.
यामध्ये पंकजा गोपीनाथराव मुंडे, सदाशिव रामचंद्र खोत, डॉ. परिणय रमेश फुके, भावना पुंडलीकराव गवळी, कृपाल हिराबाई बालाजी तुमाने, योगेश कुंडलीक टिळेकर, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, शिवाजीराव यशवंत गर्जे, अमित गणपत गोरखे, मिलिंद केशव नार्वेकर आणि राजेश उत्तमराव विटेकर यांचा समावेश आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद, जय महाराष्ट्र’.
तसेच भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले. तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले यांच्यासह अधिकारी वर्ग, नवनिर्वाचित सदस्यांचे आप्त, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.