न्याय प्रणालीचे अपयश आणि मानवाधिकार संकटाचे जागतिक प्रतीक
किन्शासा – कोंगोच्या राजधानी किन्शासा येथील मकाला तुरुंगातील हिंसक घटनेने कोंगो देशातील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेवर प्रकाश टाकला आहे. ढिसाळ तुरुंग व्यवस्थापन, भ्रष्टाचार, आणि न्यायालयीन प्रक्रियांची दिरंगाई यामुळे तुरुंगात १,५०० क्षमतेच्या जागेत १२,००० कैदी ठासून भरले गेले आहेत. त्यामुळे कैद्यांनी हताश होऊन सोमवारी (२ सप्टेंबर) पलायनाचा प्रयत्न केला. यावरून कोंगोतील तुरुंग हल्ला हा न्याय प्रणालीचे अपयश आणि मानवाधिकार संकटाचे जागतिक प्रतीक असल्याचे मानले जात आहे.
या घटनेत १२९ कैद्यांचा मृत्यू आणि ५९ जण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २९ कैदी ठार झाले, तर चेंगराचेंगरीत अनेकांचा प्राण गेले. या घटनेदरम्यान कैद्यांनी महिलांवर बलात्कार केला, तुरुंग जाळला, अशा घटनांमुळे तुरुंगाची मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे. तुरुंगात प्रचंड संख्येत ठासून भरलेले कैदी आणि न्याय प्रक्रियेतील प्रलंबन तसेच अपयश यामुळे कैद्यांच्या माणुसकीच्या पातळीवर होणाऱ्या अन्यायाचा हा उद्रेक मानला जात आहे. अनेक कैदी अद्याप न्यायालयीन सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे त्यांच्या मूलभूत मानवाधिकारांचे उल्लंघन होते आहे.
हा प्रकार कोंगोच्या सरकारच्या असमर्थतेचे आणि न्याय प्रणालीतील त्रुटींचे प्रतिबिंब आहे. २०१७ मध्येही अशाच प्रकारे एका धार्मिक गटाने तुरुंग फोडून कैद्यांची सुटका केली होती. अशा घटनांमधून कोंगोतील तुरुंग व्यवस्थापनाकडून कोणतेही ठोस सुधारात्मक पावले उचलली गेली नाहीत हे अधोरेखित होते. या घटनेने कोंगो देशातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच मानवाधिकारांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. सरकारने त्वरित कारवाई करून न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा देशातील अस्थिरता अधिकच वाढू शकते.