बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण अव्वल!

0

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. तसेच यंदाही या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 15,20,181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 15,09,848 विद्याथी परीक्षेला बसले होते. यातील 13, 87,125 विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 91.60 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के लागला.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,083 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या निकालाची टक्केवारी 49.82 इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील तनीशा बोरमणीकर या विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत 582 आणि 18 क्रीडा गुण असे एकूण 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत. ती बुद्धीबळ खेळाडू आहे. तिने सांगितले की, वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा चालू असल्याने मी शेवटचे दोन महिने अभ्यास केला. मला 100 टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा नव्हती, परंतु 95 टक्के गुण मिळतील, असे वाटत होते. पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech