गोरखपूर – भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा आज, शुक्रवारी नेपाळमध्ये अपघात झाला. उत्तरप्रदेशच्या पोखरा येथून काठमंडूला जाणारी ही बस स्थानिक तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. यात 40 प्रवासी असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान या दुर्घटनेत राज्यातील जळगाव येथील प्रवासी असल्याची माहिती पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला मदत कार्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात उत्तर प्रदेशची एक बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळून अपघात झाला. या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी होते. त्यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोखराहून काठमांडूसाठी निघाले होते. नेपाळच्या सशस्त्र पोलिसांचे सहायक प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून 14जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 16 जखमींना वाचवण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेवर शोक व्यक्त करत ट्विट केलेय. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच नेपाळ दुतावास आणि उत्तरप्रदेशातील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांशी राज्य प्रशासन संपर्कात आहे. तसेच नेपाळच्या सरकारशी समन्वय साधून मृतदेह राज्यात आणण्यासाठी समन्वय साधला जात असून राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील समन्वय आणि संपर्काचे काम करीत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.