गणेश विसर्जनाला गालबोट, राज्यभरात १५ जणांचा मृत्यू

0

मुंबई – गणेश विसर्जनाचा उत्साही आणि भक्तिमय सोहळा यंदा राज्यभरात अनेक दुर्दैवी घटनांमुळे गालबोट लागून संपला. विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, त्यामुळे हा उत्सव दुःखमय झाला आहे. धुळ्यातील चितोड येथे मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन बालकांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक वाहन सुरू केल्याने हे बालक ट्रॅक्टरखाली चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील वालदेवी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे हे दोन युवक नदीतील एका खड्ड्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण पूर्णा नदीपात्रात वाहून गेले. मयूर ठाकरे आणि अमोल ठाकरे यांचा यात समावेश आहे. दारापूर येथे २७ वर्षीय राजेश पवार हा युवक देखील पाण्यात बुडाला.

अहमदनगर जिल्ह्यातील विळद गावातील साकळाई तलावात गणपती विसर्जन करताना दोन युवकांचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला. अजिंक्य नवले (१६) आणि केतन शिंदे (१८) अशी मृतांची नावे आहेत. जिंतूर तालुक्यात गणेश विसर्जनावेळी करपरा नदीत १३ वर्षीय भागवत अंभोरे वाहून गेला. तसेच, जिंतूर शहरात डीजेच्या आवाजामुळे ३७ वर्षीय संदीप कदम यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.

इंदापूरच्या निरा नरसिंहपुर येथे विसर्जनासाठी आलेला अनिकेत कुलकर्णी हा युवक नीरा नदीत बुडाला. अकोल्यातही म्हैसांग येथे गणेश विसर्जनावेळी १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. राज्यभरातील या दुर्घटनांमुळे गणेशोत्सवातील आनंद अचानक दुःखात बदलला आहे. गणेश भक्तांनी या दुर्घटनांमुळे आपल्या प्रिय गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech