बाप्पाच्या विसर्जनावेळी १५ ते २० भाविकांवर मधमाशांचा हल्ला

0

रायगड – रायगड जिल्हयातील तळा तालुक्यातील मौजे हनुमान नगर येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने धावपळ आणि धांदल उडाल्याने विसर्जनला आलेले भक्त सैरावैरा पळू लागले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान विसर्जन मिरवणूक खाडी किनारी आली असता काही कळायच्या आत अचानक उठलेल्या मधमाशांनी विसर्जन मिरवणुकीतील भाविकांवर हल्ला केला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. तालुक्यातील हनुमान नगर येथील ग्रामस्थांकडून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गावातून वाजत – गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.

या मिरवणुकीत गावातील सर्व ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मधमाशांनी जवळपास १५ ते २० भाविकांना दंश केला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. या सर्वांना तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मोघे यांनी जखमींवर तातडीने उपचार करून काहींना सोडून दिले. तर ज्यांची प्रकृती गंभीर होती अशाना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून त्यांनाही घरी सोडण्यात आलं आणि आराम करण्याचा सल्ला दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech