ठाणे : “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज, २२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार अमित शहा व मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्यातील २० लाख लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण, १० लाख लाभार्थ्यांना एका क्लिकमध्ये पहिला हप्ता दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
त्यानुषंगाने ठाणे जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत १८ हजार २४८ चे उद्दिष्ट असून यापैकी एकूण १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थींना तालुकानिहाय मंजुरी पत्र प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरावर प्रातिनिधीक स्वरूपात १५ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे काम उत्तम प्रकारे पूर्ण केलेल्या तीन लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यात ठाणे जिल्ह्यातील घरकुलांचे काम उत्तम प्रकारे केले आहे. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असणे महत्त्वाचे आहे. यामुळे लाभार्थ्यांनी दर्जेदार, उत्कृष्ट घरकुल तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी व मयत झालेल्या लाभार्थींच्या कुटुंबासाठी प्रशासनाने तसेच लाभार्थ्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना केले.
घरकुल नोंदणी, मंजुरी यासाठी ठाणे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे. ग्रामस्थांना स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. घर मिळवून देण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच जिल्हा परिषद मार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन ज्या पध्दतीने काम करीत आहे, त्यासाठी लाभार्थ्यांनी देखील घर बांधणी वेळेत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले की, घरकुल नोंदणी व मंजुरी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी- कर्मचारी यांनी मिशन मोडवर केवळ ७ दिवसात कामकाज पूर्ण केले आहे, यासाठी त्यांनी विभागाचे कौतुक केले. तसेच लाभार्थ्यांनी त्यांना मंजूर झालेली घरे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा शुभेच्छा दिल्या.
ठाणे जिल्हयामध्ये मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी १७ हजार ९७५ पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरीत व लाभार्थ्यांना पहिला हप्ता एका क्लिकवर वितरीत करण्यात आला आहे. “स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ महत्त्वाची योजना असून आज मला मंजुरी पत्र व पहिला हप्ता देण्यात आला, ही माझ्या कुटुंबियांसाठी आनंदाची बाब आहे.”
-अर्चना यशवंत पतंगराव, अंबरनाथ तालुक्यातील लाभार्थी.……………………………………………………
“माझं कुडाच्या घरात बालपण गेलं आणि लग्नानंतर देखील कुडाच्या घरातच राहत होतो. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा १ अंतर्गत माझं स्वतःचं घर तयार झालं आहे, यासाठी मी प्रशासनाची आभारी आहे.”
– विद्या उत्तम पाटील, भिवंडी तालुक्यातील लाभार्थी.