गडचिरोली – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी मोठा आयईडी स्फोट घडवला. या स्फोटात २ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे तर अनेक जवान जखमी झाले आहेत. एकीकडे सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असताना दुसरीकडे माओवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केले. नक्षलविरोधी अभियानावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर हा हल्ला करण्यात आला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
२०१ कोब्रा वाहिनीची अॅडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलिस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटी दरम्यान ट्रक आणि दुचाकीने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होते. याचवेळी नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. दरम्यान, आज दुपारी ३ च्या सुमारास २०१ कोब्रा कॉर्प्सच्या एका ट्रकवर आयईडी स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले असून उर्वरित सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती आहे. यात शहीद जवानांची नावे विष्णू आर आणि शैलेंद्र अशी सांगण्यात येत आहेत.
सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले. कोराजगुडा जंगलात माओवादी चक्क बनावट नोटा बनवत असल्याचे आढळून आले. यात ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने आढळून आले. पश्चिम बस्तर भागात २०२२ पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देत होते, असे तपासातून पुढे आले.