मिर्जापूर – उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला तर बिहारमध्ये ९ कर्मचारी दगावले. वाढत्या उन्हामुळे शुक्रवारी या सर्वांना ताप आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात या सर्वांचे निधन झाले. मिर्जापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही माहिती दिली. उष्माघातामुळेच त्यांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
मिर्जापूर येथील मॉं विंध्यवासिनी स्वशासी राज्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजबहादुर कमल यांनी सांगितले की, मृतांमध्ये ७ होमगार्डचे जवान, ३ सफाई कर्मचारी, सीएमओ कार्यालयात नियुक्तीवर असलेला एक लिपिक, एक अधिकारी आणि होमगार्डच्या टीममधील एका शिपायाच्या समावेश आहे. हे सर्व जण जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयात आले, तेव्हा त्यांना प्रचंड ताप होता, उच्च रक्तदाब होता. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले होते. मिर्जापूर येथे उद्या एक जून रोजी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वीच तब्बल १३ कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
दरम्यान, आणखी १७ कर्मचारी रुग्णालयात आहेत. निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या १३ कर्मचा-यांच्या मृत्यूनंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना अतिशय वाईट आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यातच बिहारमध्येही ९ कर्मचारी दगावले. या सर्वांचा मृत्यू कसा झाला, हे सांगण्यात येत नसले तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.