अमरावती : बेलोरा विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दरम्यान त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. विमानतळ परिसरात सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षकांनी एका पोलिस निरीक्षकांसह २४ अंमलदारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आजपासून बेलोरा विमानतळ परिसरात पोलिस चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.
पोलिस निरीक्षक संतोष डाबेराव यांच्यासह १० पोलिस जमादार आणि १४ पोलिस शिपाई अशी एकूण २५ पोलिस अधिकारी, अंमलदारांची नियुक्ती विमानतळाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये १० महिला पोलिसांचाही समावेश आहे. हे पोलिस पथक आठ तासांची एक याप्रमाणे तीन पाळीमध्ये चोवीस तास विमानतळाची सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. आता पूर्णवेळ सुरक्षा तैनात झाल्यामुळे अमरावती विमानतळावरून लवकरच प्रवासी विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे दिसत आहे.