रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी येत्या गुरुवारपासून (दि. १२) एसटीच्या २५५३ फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असून त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील. एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्याकरिता आतापर्यंत २५५३ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ऑनलाइन बुकिंगप्रमाणे यावर्षी ग्रुप बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुहागर तालुक्यातून ग्रुप बुकिंगला सर्वाधिक म्हणजे २०८ गाड्या आरक्षित झाल्या आहेत. गुरुवारी १२ सप्टेंबरला १८७ बसेस, दि. १३ सप्टेंबरला ८३२, , दि. १४ सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे ९२९ बसेस सोडण्यात येणार आहेत. दि. १५ सप्टेंबरला ३३१, दि. १६ सप्टेंबरला १०८, दि. १७ सप्टेंबरला ८३, दि. १८ सप्टेंबरला ८० गाड्या सोडल्या जातील. दि. १९ आणि २० सप्टेंबरलासुध्दा आवश्यतेनुसार फेऱ्या सोडण्यात येणार असून त्याचे आरक्षण सुरू आहे. परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येक आगारात अन्य आगारातून आलेल्या जादा एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बाहेरील आगारातून आलेल्या ७३५ बसेस, जिल्ह्यातील १०८ बसेसच्या माध्यमातून २५५३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.