कोल्हापूर : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीच्या यात्रेतील महाप्रसादामुळे गावातील सुमारे ३०० ते ३५० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.या यात्रेनंतर रात्रीपासून गावातील अनेकांना वांती आणि जुलाब सुरू झाले. बुधवारी सकाळपर्यंत बाधितांची संख्या वाढल्याने गंभीर रुग्णांना इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात दाखल केलें असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा पार पडली. यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मात्र मध्यरात्रीनंतर काही नागरीकांना उलटी, जुलाबाचा त्रास होत असल्याने प्रारंभी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत होते. मात्र ही संख्या वाढत असल्याने विषबाधा झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. अचानक मोठ्या संख्येने रुग्ण वाढू लागल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजी व काही खाजगी रुग्णालयांत रुग्ण दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार सुरू असतानाच बाधितांची संख्या वाढल्याने इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात १०० जणांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला. बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश आहे.
विषबाधाची घटना समजताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तालुक्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रीय करुन रुग्णावर उपचार सुरु केले. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात येत होते. तसेच आरोग्य विभागाचे तीन पथके घरोघरी जाऊन विषबाधेतील रुग्णांची माहिती घेत होते. इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना बोलावून उपचार प्रक्रिया गतिमान केली.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी खटावकर उपचाराबाबत नियोजन करत होते. दुपारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी रुग्णांची भेट घेतली. तसेच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, तहसीलदार अनिल हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जि.प. माजी सदस्य विजय भोजे, पृथ्वीराज यादव यांच्यासह राजकीय नेत्यांनी भेट देवून रुग्णांसह नातेवाईकांना धीर देत होते.