बीजिंग- चीनच्या पुरातत्त्व विभागाने उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ खोदकाम करून एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.या खोदकामात २ हजार वर्षांपूर्वीच्या काळातील ४४५ थडगी सापडली आहेत.या थडग्यांच्या आधारे त्या काळातील अंत्यसंस्कार आणि रीतीरिवाज समजण्यास मदत होणार आहे.
लिन्फेन शहरातील शुएझुआंग गावाच्या सुमारे ५०० मीटर अंतरावर हे थडग्यांचे कब्रस्तान आढळले आहे. शांक्सी प्रांतीय पुरातत्त्व संस्थेच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन करण्यात आले.संस्थेचे संशोधक दुआन शुआंगलोंग यांनी सांगितले की, ही थडगी वेगवेगळ्या आकाराची आहेत.तसेच या उत्खननात ७०० पेक्षा अधिक पुरातन वस्तू सापडल्या आहेत. लोखंडी उपकरणे,मृत्तिका पात्रे,हिरे आणि हाडांपासून बनवलेल्या कलाकृती समावेश आहे.या थडग्यांतून सापडलेल्या विविध वस्तूंच्या आधारे त्या काळातील हस्तकला,व्यापार आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांच्याबद्दल देखील माहिती मिळू शकेल. या वस्तूंचे सखोल विश्लेषण करून युद्धरत राज्यांच्या काळात त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेबद्दलची मौल्यवान माहिती मिळण्यास मदत होईल.