मुंबई – अनंत नलावडे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती गुरूवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमाही करण्यात आली असून या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट असल्याने अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.नवी मुंबई येथे अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
कोणत्याही योजना बंद होणार नाहीत…
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नसून या लेखाशिर्षात त्यासाठी पुरेशी तरतूदही उपलब्ध आहे.मात्र जेव्हा तरतूद नसते,तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते.याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेशही जारी करण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास मंत्रिमंडळ बैठकीतच स्पष्ट केले.