उष्माघातामुळे शाळेतील ४८ विद्यार्थीनी बेशुद्ध

0

पाटणा : सध्या देशातील अनेक भागात उष्णतेचा कहर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमानामध्ये सरासरीपेक्षा कमालीची वाढ नोंदवली जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये तर तब्बल ५० डिग्री (४९.९ डिग्री) एवढे तापमान नोंदवले गेले आहे. त्याशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पारा वाढला असून उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. काही राज्यांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. मात्र बिहारमध्ये अद्याप शाळा सुरू असून आज राज्यातील बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळांमध्ये तब्बल ४८ विद्यार्थिनी वर्गात बेशुद्ध होऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेखपुरामधील एका शाळेत भयंकर उकाड्यामुळे विद्यार्थिनींची तब्येत एवढी बिघडली की, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. उन्हाळ्याच्य प्रकोपामुळे शेखपुरा जिल्ह्यातील मनकौल उत्कमित मध्य विद्यालयासह इतर काही शाळांमधील विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. यातील काही विद्यार्थिनी या प्रार्थनेवेळी तर काही विद्यार्थिनी या वर्गांमध्ये बेशुद्ध पडल्या. एकाच वेळी एवढ्या विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याने शिक्षकही गोंधळून गेले. या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली, त्यानंतर त्यांनीही शाळेत धाव घेतली. नंतर या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बेगुसरायमध्येही अशीच घटना घडली. तिथे मटिहानी मध्य विद्यालयामध्ये भीषण उकाड्यामुळे १८ विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. बेगुसरायमध्ये सध्या तापमान ४० डिग्रीच्या वर पोहोचले आहे. तसेच उन्हाळ्याचा कहर सुरू असतानाही शाळा सुरू आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech