पालघर : डहाणू महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. दुसऱ्या वर्षी ही संख्या वाढली होती. यावर्षी पाच लाख नागरिक या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविणार, असा विश्वास वनेमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासचा परिसर चौथी मुंबई होणार असून उंच भरारी घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. डहाणू येथील सिव्यू पार्क,डहाणू-आगर रोड येथे डहाणू नगरपरिषद यांच्यावतीने आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव ३.० उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.
नाईक पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे देशाचे नाव उज्वल करणारे असे बंदर होणार आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक चालना मिळणार आहे. तसेच या महोत्सवात विविध बचत गट व इतर असे एकूण २०० स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच इतर खाद्यपदार्थांचेही स्टॉल असल्याने पर्यटकांना मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. गेल्या महोत्सवात ३ लाख पर्यटकांनी भेट दिली होती.यावर्षी ही संख्या ५ लाखापर्यंत जाईल याची मला खात्री आहे, असे पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले.
यावेळी पालकमंत्री यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची पाहणी केली हा महोत्सव तीन दिवस चालणार असून या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांचे रूप रेषा असणार आहे महोत्सवाचा स्थानिकांनी व इतर पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.