पुणे – राज्यात शालेय शिक्षण विभागाकडून शालाबाह्य मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. अशा मुलांचे शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे जुलै महिन्यात सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. मात्र, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्हयातच ५०७ शाळाबाह्य मुले निघाल्याने शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण मोहीम फोल ठरली असल्याची माहिती समोर आली आहे.
या अभियानात पुणे जिल्हयात एकूण ५०७ मुले आढळल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नाईकडे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुके, पीसीएमसी, पीएमसीमधून ३१० मुले- मुली स्थलांतरित होऊन बाहेर गेली आहेत, तसेच अन्य राज्य व जिल्ह्यांतून ५०७ मुले- मुली स्थलांतरित होऊन पुण्यात आली असल्याची माहिती शाळाबाह्य सर्वेक्षण अभियानातून पुढे आली आहे.एकूण ५०७ पैकी २८१ मुलांना शाळेत सामावून घेण्यात आले आहे, तर उर्वरित मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नाईकडे यांनी दिली.
शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे.जिल्ह्यातून एकूण ३१० स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकांमध्ये मुलींची संख्या १५५, तर मुलांची संख्या १५५ इतकी आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकांची संख्या १४७ आहे.