सोलापूर – उजनी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडून देण्यात आले. ४ ऑगस्टपासून आतापर्यंत धरणातून तब्बल १०५ टीएमसी पाणी नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले आहे. तरीदेखील अद्याप काही बंधारे, मध्यम-लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसल्याची स्थिती आहे. उजनी धरण सध्या ११० टक्क्यांपर्यंत भरले असून धरणात दौंडवरून नऊ हजार क्युसेकची आवक आहे. उजनीतून सध्या भीमा नदीतून १० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत असून याशिवाय धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे.
त्यातून दररोज तीन लाख युनिट विजेची निर्मिती होते. ४ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास एक कोटी ७४ लाख युनिट वीज तयार झाली असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटींपर्यंत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उणे पातळीतील उजनी धरण अवघ्या १० ते १२ दिवसांत १०० टक्के भरले आणि ४ ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीसह कालवा, बोगदा व उपसा सिंचन योजनांमधून अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने ते सगळे पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. समाधानकारक बाब म्हणजे धरणातून पाणी सोडायला सुरवात झाल्यापासून तेथील विद्युत प्रकल्पातून दररोज तीन लाख युनिट (प्रतितास १२५०० युनिट) विजेची निर्मिती होत आहे. ‘महावितरण’कडून ही वीज साधारणत: साडेतीन रुपये प्रतियुनिट या दराने खरेदी केली जाते.