रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी धरणासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर

0

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या सुधारणा आणि दुरुस्तीसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पणदेरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे तसेच धरणाचा सांडवा फुटल्यामुळे धरण संपूर्ण क्षमतेने भरत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जलसंपदा विभागाने पणदेरी धरणासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन आदेश जारी केला आहे.

या धरणामुळे घोसाळे, पणदेरी, बहिरवली, कोंडगाव आणि दंडनगरी या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या दुरुस्तीमुळे स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. धरण फुटू नये यासाठी तो सांडवा फोडून धरण रिकामे करण्यात आले होते. त्यांनंतर धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली. गेली चार वर्षे धरण दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होते याचा पाठपुरावा योगेश कदम घेत होते. आता त्याचा निधी मंजूर झाला आहे. धरणामध्ये गाळ साचल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होत नव्हता. परिणामी, धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईचा मोठा फटका बसत होता. आता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने या भागातील भातशेती करणारे शेतकरी तसेच आंबा, सुपारी, काजू इत्यादी फळबागांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
पणदेरी धरणाचे काम सन १९९५-९६ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, सध्या या धरणाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने राज्यमंत्री कदम यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक ३ एप्रिल रोजी ६० कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असून, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेद्वारे कामाला सुरुवात होईल. मंडणगड तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेला हा धरण प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि महिलांनी राज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech