९८ वे अ.भा.म.सा.संमेलन : ‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू

0

नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता. जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरूद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो मराठी बांधव मोठ्या उत्साहाने मराठमोळ्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती. ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे फुगडी खेळली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली दिल्लीकरांची मने
संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या रचना अशी आकर्षक सजावट चित्ररथावर करण्यात आली होती. दिल्लीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या अभिजात भाषा- संस्कृतीचे दर्शन घडले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech