पंढरपूर – पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोर खचलेला दगड हटवताच एक तळघर आढळले. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी या तळघराची पाहणी करणार आहेत. या तळघराबाबत वारकऱ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन भाविक हनुमान दरवाजातून बाहेर पडतात, तेथे डावीकडे काल मध्यरात्री काम सुरू असताना दगड खचलेला आढळला. हा दगड हटवताना खालच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या. त्यानंतर तिथे एक तळघर आढळले. त्याची खोली सात-आठ फूट आहे. या तळघरात अंधार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, मार्च महिन्यापासून विठ्ठल मंदिरातील पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. आता संवर्धनाचे काम बहुतांशी पूर्ण झालेले असून २ जूननंतर गाभारा आणि मुख्य गाभाऱ्यात भाविकांना विठ्ठलाचे साजिरे रूप जवळून न्याहाळता येणार आहे.