* खोटी कागदपत्रे तयार करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप
* लाचलुचपत विभाग करणार चौकशी
ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांच्यासह पाच जणांच्या विरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे. खोटे दस्ताऐवज तयार करून त्याच्या अभिलेखात नोंदी करत त्याचा खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी गैरवापर करण्यात आला . मनीष जोशी हे संबंधित पदावर नसताना त्यांनी नोटीस काढली असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. दरम्यान जोशी यांनी हे आरोप फेटाळले असून त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे सांगितले .
ठाणे महापालिका उपायुक्त मनिष जोशी, कळवा प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी सुरेश शिवलाल राजपुत, कनिष्ठ अभियंता रविंद्र दत्तात्रय कासार, मुख्य प्रशासकीय कार्यालय अधिकारी बाळू हनुमंत पिचड, उथळसर प्रभाग समितीचे तत्कलीन कर्मचारी गगनसिंग दानसिंग थापा या पाचजणांवर विरोधात विविध कलमा नुसार शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे .
या प्रकरणातील तक्रारदार ऍड राजेश काकड यांनी दिलेल्या माहिती नुसार ठाण्याच्या टेम्भी नाका परिसरात श्री सुब्रत हौसिंग सोसायटी ही बेकायदा इमारत असून या ठिकाणी बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणी २०१० साली आपल्याला महापालिकेच्या वतीने एक नोटीस देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या नंतर कोणतीही सुनावणी न घेता , मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता खोटा पंचनामा करून, खोट्या कागदपत्रांच्या मदतीने माझ्या विरोधात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता .
विशेष म्हणजे ज्यांनी नोटीस दिली ते मनीष जोशी हे त्या काळात त्या पदावर नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने २०१३ सालीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्या विरोधात लाचलचुपत विभागाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती , दुसरीकडे न्यायालयाचा कोणताही स्टेट नसताना देखील पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते . अखेर २०२२ साली लाचलुचपत विभागाने आपली याचिका मागे घेतली , हा प्रकार जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या नंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . विशेष म्हणजे सोसायटी आणि संबंधित अधिकारी यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोपही काकड यांनी केला आहे .
स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता कायद्यामधील तरतुदीची जाणीवपुर्वक व हेतुपरस्पर अवज्ञा करून खोटे, बनावट आणि चुकीचे दस्ताऐवज तयार केले. या दस्ताऐवजाच्या शासकीय अभिलेखात नोंदी केल्या. तसेच हे दस्ताऐवज समान उद्देश साध्य करण्याकरिता संगनमताने कट रचून न्यायालयीन अभिलेखात पुराव्याकामी दाखल करून कायद्याने माहिती देणे बंधनकारक असताना सुद्धा जाणीवपुर्वक खोटी माहिती देऊन तक्रारदारांना नुकसान पोहचविण्याच्या दृष्टीने आणि तक्रारदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा गैर उद्देशाने पदाच दुरूपयोग करत खोटी तक्रार दाखल करून गुन्हेगारी गैरवर्तन केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कवळे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान “तक्रारदाराने केलेले आरोप चुकीचे आहेत. इमारतीत बेकायदा वाढीव बांधकाम केल्याची तक्रार इमारतीमधील रहिवाशांनी केली होती. त्याआधारे नोटीस देऊनही त्यावर उत्तर मिळत नसल्यामुळे तक्रारदारावर एमआरटीपीची कारवाई करण्यात आली होती. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे अशी माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.