टोकियो – जपानमध्ये मानवी शरीराच्या आतील मांस खाणारा एक धोकादायक विषाणू आढळला असून, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचा केवळ दोन दिवसांत मृत्यू होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये या विषाणूची लागण झालेल्या 977 रुग्णांची नोंद झाली आहे. मानवी शरीरातील मांस खाणार्या या विषाणूचे नाव स्ट्रेप्टोकोकाल टॉक्सिक सिंड्रोम असे असून, या विषाणूची लागण झाल्यानंतर आलेल्या आजारपणानंतर रुग्णाचा केवळ 48 तासांत मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता जपानच्या राष्ट्रीय साथरोग संस्थेने व्यक्त केली आहे. या संस्थेतर्फे 1999 पासून या विषाणूचा मागोवा घेतला जात आहे. जून महिन्यात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 977 पर्यंत गेल्याचे निरीक्षणही या संस्थेने नोंदवले आहे.
या विषाणूचा प्रादुर्भाव हा घशावाटे होत असून घसा कोरडा पडणे व घशाला आतून खाज सुटण्याची लक्षणे आढळून येतात. त्यानंतर हा विषाणू फुफ्फुसात जातो. त्याचप्रमाणे रुग्णाला ताप येऊन त्याचा रक्तदाब कमी होतो. यानंतर शरीरातील पेशी नष्ट होऊन व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊन त्याचे अवयव निकामी होतात व त्याचा मृत्यू होतो अशी माहितीही संस्थेने दिली आहे. या संस्थेतील प्राध्यापक केन किकुची यांनी सांगितले आहे की, यासाठी लोकांनी आपल्या हाताच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे चेहर्याला वारंवार हात लावू नये. या विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या पायाला सुज येते. ती काही तासात गुडघ्यापर्यंत पोहोचते व त्यानंतर रुग्णाचा 48 तासांत मृत्यू होतो. पन्नाशी नंतरच्या रुग्णांना याचा अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो.