आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा कंपनीतील कर्मचाऱ्याचा?

0

मुंबई – आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला. आईस्कीमचे पॅकिंग करताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. त्यात त्याच्या हाताचे बोट तुटले होते. या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन त्याची पोलिसांनी चौकशी केली. गेल्या महिन्यात आईस्क्रीम पॅकिंग करतेवेळी हा अपघात झाल्याचे चौकशीत समजले.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने यम्मो कंपनीचे आईस्क्रीम कोन घरी मागवले होते. त्यावेळी तिचा भाऊ डॉ. ब्रँडन फेर्राव याला या आईस्क्रीममध्ये एक मानवी बोटाचा अवशेष सापडला होता. या प्रकरणी त्याने मालाड पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरु केलेला तपास आईस्क्रीम कंपनीच्या इंदापूर येथील डेरीपर्यंत पोहोचला. या डेरीत अपघात होऊन कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाव तुटल्याचे उघडकीस आले. परंतु याची कुठलीही अधिकृत तक्रार करण्यात आली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे बोट त्याच कर्मचाऱ्याचे आहे, याचा तपास लागू शकेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech