मुंबई – राज्य सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश योजना राबवायला सुरू केली आहे. या वर्षीपासून ही योजना सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना तीन दिवस शाळेचा तर तीन दिवस स्काऊट गाईडचे गणवेश मोफत देण्यात येणार आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून या गणवेशांची शिलाई सुरु असून ते १५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे गणवेश दिले जाणार असून विद्यार्थ्यांना नियमित गणवेश म्हणून आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पँट व विद्यार्थीनींना पाचवीपर्यंत आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट व आठवीच्या पुढे आकाशी निळ्या रंगाची कमीज व निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी असा गणवेश असून हा गणवेश त्यांना सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी परिधान करावा लागणार आहे. मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी स्काऊट व गाईडचा गणवेश परिधान करावा लागणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये महिला बचत गटामार्फत नियमित गणवेशांची शिलाई सुरु झाली असून स्काऊट गाईडच्या गणवेशांच्या शिलाईसाठी एका गणवेशाला ११० रुपये या प्रमाणे रक्कम संबंधीत शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येणार आहेत.