ईडीने सादर केला केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल
नवी दिल्ली : दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यात अडकलेल्या आम आदमी पक्षाला परदेशातून फंडिंग मिळाल्याची माहिती पुढे आलीय. यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केलाय. ईडीने गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालानुसार आम आदमी पार्टीला परदेशातून 2014 ते 2022 या काळात 7.08 कोटी रुपयांचा निधी मिळालाय. परंतु, हा फंड देणाऱ्या परदेशी देणगीदारांची नावे आणि अन्य माहिती लपवण्याचा आरोप ईडीने केला आहे. आम आदमी पार्टीला संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात, कुवैत, ओमान आणि अन्य देशातून देणगी मिळाली आहे. फंड ट्रान्सफर करण्यासाठी विविध देणगीदारांकडून एकच पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे. ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. यात पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांवर 2016 मध्ये कॅनडातून फंड रेजिंग प्रोग्रामसाठी जमवलेले पैसे व्यक्तिगत लाभासाठी दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
इतकेच नाही तर अनिकेत सक्सेना ( आप ओवरसीज इंडिया कॉर्डिनेटर), कुमार विश्वास ( तत्कालीन आप ओवरसीज इंडियाचे संयोजक), कपिल भारद्वाज आणि पाठक यांच्यासह विविध स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाठवण्यात आलेल्या ईमेलचा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासणीत संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडामध्ये फंड रेजिंग कॅम्पेनमधून केवळ पैसा गोळा केला नाही तर परदेशी फंडासाठी एफसीआरए अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधापासून वाचण्यासाठी देणगीदारांची माहिती लपवली जात आहे असा आरोप ईडीने केला आहे.