काळू धरणाला गती द्या…….!, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0

मुंबई : अनंत नलावडे
ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर, भिवंडी आणि भिवंडी ग्रामीण भागातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या एका बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.यासंदर्भातील भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामांनाही तातडीने गती देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याचेही आदेश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

आज मंत्रालयात या विषयावर आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर,वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक सचिव संजय बेलसरे,ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले उपस्थित होते.पालघर आणि ठाणे जिल्हाधिकारी, पालघरचे वन विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

शिंदे म्हणाले, “काळू धरण प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी महत्त्वाचा आहे.अनेक वर्षांपासून मंजूर असलेल्या या प्रकल्पासाठी खासगी आणि वन जमिनींचे भूसंपादन, तसेच पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करावीत.” पालघर जिल्हाधिकाऱ्यांनाही पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध जमिनींची माहिती सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे, तसेच बाधित गावांचा पुनर्वसन आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले.या प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. शिंदे यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech