रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागातर्फे शुक्रवारी (दि. ७ मार्च) रात्री जयगड येथे बेकायदा मच्छीमारी करणाऱ्या एलईडी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशांनंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. त्यातूनच शुक्रवारी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत ३ तांडेलांसह अंदाजे ४ लाख रुपयांचे लाइट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
दि. ७ मार्च रोजी रात्री जयगड बंदरासमोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) श्रीमती स्मितल कांबळे व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) स्वप्नील चव्हाण नियमित गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांची नौका अल-हज-हसन- (नों. क्र. IND-MH-4-MM-5701) द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगडसमोर अनधिकृतरीत्या एलईडी लाइटद्वारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर तांडेलासह ३ खलाशी होते.
ही नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाइट व लाइट पुरवणारी उपकरणे जप्त करून ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ४ लाख रुपयांचे लाइट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी श्रीमती स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व स्वप्नील चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड सुजन पवार, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. नौकेबाबतची सुनावणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे होणार आहे.