ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांना कर्मवीर पुरस्कार
ठाणे – आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संस्थेचा वर्धापनदिन व शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीचा कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षीचा हा चौथा कर्मवीर पुरस्कार ठाण्यातील प्रतिथयश अशा सरस्वती शाळेचे संचालक सुरेंद्र दिघे यांना आमदार संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
बी. बी. मोरे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नवीन फोटोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना केंद्रिभूत ठेऊन परिघावर असलेल्या शिक्षक, पालक व संस्थाचालक यांनी विद्यार्थिहितासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये आपल्या शाळेबद्दल असलेली आपुलकी वाढविण्याबद्दलचे प्रयत्न झाले पाहिजेत असे मत सुरेंद्र दिघे यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केले. शाळा महाविद्यालयासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होतं असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक व राजकीय फायदा लक्षात न घेता फक्त आणि फक्त शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन पुरस्कार्थिची निवड करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांचे कौतुक केले. शाळा व महाविद्यालयासंदर्भात सद्या घडत असेलल्या प्रकारबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थाचालकांनी व्यापक प्रमाणात पालक व विद्यार्थ्यांमध्ये सभा घेऊन विविध विषयांवर त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, जेणेकरून होणारे अनुचित प्रकार आणि पालकांचा अवाजवी आक्रोश टाळता येईल.
आमदार संजय केळकर यांनी कर्मवीर पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आणि सेवाभावी व्यक्तीची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दिघे सरांप्रमाणे सर्व शिक्षकांनी स्वयंसेवी वृत्तीने काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले. संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी कर्मवीर पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करत असताना दिघे सरांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. बी. बी. मोरे साहेबांनी खडतर परिश्रम घेत संस्था कशी उभी केली या आठवणींना उजाळा दिला. तसेच संस्थेच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र पाठक, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, बाबासाहेब दगडे, काशिनाथ कचरे, सौ. कविता कर्वे- वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख म्हणून प्रा. प्रदीप सोनजे व इतर शिक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंदार टिल्लू, प्रास्ताविक वंदना भालेकर यांनी तर मानपत्राचे वाचन प्राचार्य संतोष गावडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.