मुंबई : राज्यात सोमवारी सकाळपासूनच मुंबईत मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखवला पण अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याने मतदारांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. पवई येथील मतदान केंद्रावर आलेल्या विचित्र अनुभवामुळे महिलांचे लाडके भावोजी चांगलेच संतापले. मतदारांना दोन ते तीन तास मतदान केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि याबाबतचा लाइव्ह व्हिडीओ करत आपली नाराजी व्यक्त केली.
अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी पवई मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद असल्याची तक्रार करत सोशल मीडियावर लाइव्ह केले. साधारणतः दुपारी 12 वाजताच्या सुमारास बांदेकर यांनी ईव्हीएम बंद असल्याची तक्रार करत दोन ते तीन तासापासून मतदार मतदानाच्या रागांमध्ये ताटकळत उभे असल्याची तक्रार केली. त्यावेळी अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळले उभे असल्याचे सांगितले.
आदेश बांदेकर यांच्या तक्रारीनंतर या मतदार केंद्रावर काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, त्यांच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने तासाभराने ईव्हीएम सुरू करून येथील मतदान प्रक्रिया सुरू केली. पण, शिंदे गटाचे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांना मतदान केंद्राच्या आत सोडल्याने या ठिकाणी आणखी गोंधळ वाढल्याचे पाहायला मिळाले.
याबाबतची माहिती देत आदेश बांदेकरांनी सांगितले की, सर्वांना समान न्याय हवा. कोण सेलिब्रिटी, कोण मतदार असे काही नसते. मतदारांना चार – चार रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यापेक्षा गतीमान मतदानाची व्यवस्था केली असती तर चांगले झाले असते. लोकांचा उद्रेक आहे हे सर्वांना माहीत आहे. मतदानाच्या वेळीच नियोजन होणे गरजेचे होते. काही मतदान केंद्रात खूप गर्दी आहे तर काही मतदान केंद्र रिकामे पडले होते. हा प्रकार पाहून हा रणनीतीचा भाग होता की काय? असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
तर, दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले की, मी सर्वसामान्य मतदार म्हणून मतदान करायला आलो आहे. कोणी दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून मतदान करायला आलेलो नाही. माझ्या त्रासा इतका त्रास इतरांना झाला आहे. कधीच असे होत नाही. 15 मिनिटात मतदान करुन आम्ही गेलो आहे. हे पहिल्यांदाच होत आहे. जवळपास साडेतीन तास मतदान केंद्रावर आहे. मतदान केल्याशिवाय जाणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.