कोल्हापूर – आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे, असे मत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त करीत कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर टीका केली. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. नेसरी येथे शिवशाहीतील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक, त्यांचा अश्वारूढ पुतळा आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी बोलतानाच संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा नामोल्लेख न करता त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले.
समोरच्या मल्लाला हात लावायचा नाही. त्यास टांग मारायची नाही. असे असेल तर कुस्ती होणार कशी, अशी विचारणा करून मंडलिक म्हणाले, कोल्हापूरचे महाराज हेसुद्धा दत्तक आलेले आहेत. खरे वारसदार तुम्ही आम्ही कोल्हापूरची जनता आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा विचार आयुष्यभर आचरणात आणला. ही भूमी राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची नगरी आहे. शाहू महाराजांचा विचार हा येथील प्रत्येकाचा डीएनए आहे. येथील सामान्य माणूस शाहू विचार घेऊन जन्माला येतो. त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारावर सर्वसामान्य जनतेचाही तितकाच हक्क आहे, असा दावा त्यांनी केला.